भोकर म्हैसा मार्गावर दोन भीषण अपघात; अंगणवाडी सेविका व युवकाचा जागीच मृत्यू
भोकर (संदिप गंगासागरे) : भोकर–म्हैसा राज्य मार्गावर रविवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांमध्ये एका अंगणवाडी सेविकेसह एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही अपघात इतके गंभीर होते की वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
भरधाव कारच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा दुर्दैवी अंत
खडकी ता. भोकर येथील अर्चना गोविंद शिंदे (वय अंदाजे 31 वर्षे) या अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत होत्या. भोकर–म्हैसा मार्गावरील नागपूर पाटी ते चिंचाळा पाटी दरम्यान त्या आपल्या एमएच 26 सीडब्ल्यू 1961 क्रमांकाच्या स्कुटीवरून जात असताना एमएच 41 एटी 1819 क्रमांकाच्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, धडकेनंतर कारने स्कुटीसह अर्चना शिंदे यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघाताची तीव्रता एवढी होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच स्कुटीचा पूर्ण चकणाचूर झाला. त्यांच्या पश्चाता नवरा, एक मुलगा, एक मुलगी असल्याचे समजते तर या घटनेने खडकी परिसरासह अंगणवाडी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.हा अपघात दुपारी दोन ते अडीच दरम्यान झाला तर पोमनाळा–सोनारीदरम्यान बसखाली मोटारसायकल; युवक ठार हा अपघात अडीच ते पावणे तीन दरम्यान झाल्या चे समजते.
याच भोकर–म्हैसा मार्गावरील म्हैसा कडून भोकर कडे येणाऱ्या बस आणि मोटारसायकल चा पोमनाळा–सोनारी दरम्यान झालेल्या दुसऱ्या भीषण अपघातात मन्मथ शंकर कापसे (रा. पळसा, ता. हदगाव, जि. नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला.
मन्मथ कापसे हे एमएच 26 एएल 6493 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून प्रवास करत असताना त्यांची एमएच 13 सीयू 6873 क्रमांकाच्या बसशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की मोटारसायकल थेट बसखाली गेली. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती.
एकाच मार्गावर दोन जीवघेणे अपघात
भोकर–म्हैसा मार्गावर अल्पावधीत झालेल्या या दोन भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
भरधाव वेग ठरतोय जीवघेणा
भोकर–म्हैसा मार्गावर वाढत्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि धोकादायक वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. एका दिवसात दोन निष्पाप जीव गमावल्याने परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment